पंढरपूर : नुकताच राज्यामध्ये आषाढी वारी सोहळा समाप्त झाला आहे. आषाढी वारीसाठी लाखो वारकरी, भक्तगण हे पंढरपूरामध्ये दाखल होत असतात. आषाढी एकादशी आणि त्यानंतरचे अनेक दिवस पंढरपूरामध्ये वारकऱ्यांचा अक्षरशः पूर आलेला असतो. या सर्व वारकऱ्यांना स्वच्छ व सुंदर वारी अनुभवण्यास मिळावी यासाठी सफाई कामगार अहोरात्र काम करत असतात. सफाई कामातून ते अनोखी ईश्वरसेवा करत असतात. पंढरपूरातील सफाई कर्मचाऱ्यांना आता विठूराय पावला आहे. राज्य सरकारकडून त्यांना ६०० चौरस फुटांची घरे देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पंढरपूर तीर्थक्षेत्र सुधारित विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामांचा समावेश आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर शहरातील २१३ सफाई कामगारांना प्रत्येकी ६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील. त्यासाठी ५५ कोटी ६१ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य हेमंत रासने यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते. पंढरपूर शहरातील सफाई कामगारांना घरे देण्याच्या प्रकल्पामध्ये एकूण १३ इमारती आणि २१३ रहिवासी युनिट आहेत. या १३ इमारतींपैकी १२ इमारती ४ मजली असून, एक इमारत ५ मजली आहे. त्यामध्ये रस्त्यालगत असलेल्या ७ इमारतींमध्ये २४ दुकानांचे गाळे आहेत. या सफाई कामगारांना लवकरात लवकर घरे देण्याच्या दृष्टीने आजच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि त्यांना योग्य ते निर्देश देण्यात येतील. या सफाई कामगारांच्या प्रलंबित घरांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात येईल आणि त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.







