पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छतेच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने देशात सातवा क्रमांक पटकाविला आहे. तर, राज्यात पहिला क्रमांक आला आहे. गतवर्षी पिंपरी-चिंचवड शहराचा देशात १३ वा तर राज्यात तिसरा क्रमांक आला होता.
स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी शहरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व मलनिस्सारण व्यवस्थेचे मूल्यांकन केले जाते. २०२४ च्या या स्पर्धेमध्ये पाच हजरांहून अधिक शहरांनी सहभाग घेतला होता. त्यात पिंपरी-चिंचवड शहराचा देशात सातवा क्रमांक आला. शहरातील कचऱ्याचे योग्य प्रकारे संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाट लावली जाते. प्रत्येक प्रभागात घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. स्रोताजवळ प्रक्रिया युनिट्स, कंपोस्टिंग, रीसायकलिंग प्लांट, बायोगॅस यंत्रणा आदींचा वापर केला जात आहे. यामुळे शहराने सात स्टार कचरा मुक्त शहर (गार्बेज फ्री सिटी) हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त केले आहे.







