पुणे : कर्ज काढून वाहन खरेदी केलेल्यांना वाहनावरील ‘कर्जाचा बोजा’ उतरविताना स्थानिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. ‘आरटीओ’च्या वाहन प्रणालीवरून अर्ज केल्यानंतर संबंधित बँकेकडून कर्जाचा बोजा नसल्याबाबतची माहिती ‘आरटीओ’कडे पाठविली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.
नागरिकांनी कर्ज काढून वाहन घेतले असल्यास कर्जफेडीनंतर त्यांना बँकेकडून त्याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. ते जमा केल्यानंतर संबंधित वाहनांवर कर्ज नसल्याची नोंद ‘आरटीओ’त करण्यात येते. त्यानंतर जुने नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) घेऊन नवीन ‘आरसी बुक’ दिले जाते. या प्रकियेसाठी वाहनधारकाला ‘आरटीओ’त प्रत्यक्ष जावे लागत होते. आता ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. ‘ऑनलाइन प्रक्रिया पारदर्शक आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर याबाबतची माहिती बँकेकडे जाणार असून, संबंधित बँक ही कर्ज बोजा नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि माहिती ‘आरटीओ’कडे पाठविणार आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही कागदपत्राची प्रत सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही,’ अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली.







