नागपूर : घरातील परिस्थिती आणि आर्थिक तणावातून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. नदीच्या काठावर पोहोचून पत्नीला फोन केला. ‘पोरांना सांभाळ, मी आत्महत्या करत आहे’, असे म्हणत नदीच्या पात्रात उडी घेतली. मात्र, वेळीच तेथे पोहोचलेल्या पोलिस आणि गावकऱ्यांनी पाण्यातून बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी ही घटना नागपुरात घडली.
पंकज राजेंद्र खोब्रागडे (वय ३३, रा. दृगधामणा, वाडी) असे या व्यक्तीचे नाव आहे. पंकज विवाहित असून, ६ वर्षांची मुलगीही आहे. तो आई-वडिलांसोबत वाडी परिसरात राहतो. त्याचा गादी तयार करण्याचा कारखाना आहे. त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. या व्यवसायासोबतच त्याने कर्ज घेऊन त्याने १२ लाख रुपये किंमतीचे (जुने) जेसीबी घेतले. बँकेचा हप्ता ३५ हजार रुपये होता. सुरूवातीला त्याने नियमित कर्जाचे हप्ते भरले. मात्र, अलीकडे काम मिळत नसल्याने बँकेचे हप्ते थकले. दरम्यान, हप्ते भरण्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे तो तणावात राहू लागला. त्यानंतर त्याने निराश होऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्याने नदीत उडीही मारली. मात्र, एका पोलिसाच्या सतर्कतेने त्याला नदीतून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे त्याचा जीव वाचला.







