मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गणित आणि इंग्रजी विषय आता अधिक रंजक आणि सोपे होणार आहेत. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या विषयांच्या संकल्पना विद्यार्थ्यांना सहज समजाव्या आणि त्यांना शिकण्याची गोडी लागावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने संपर्क फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण’ कार्यक्रमांतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या १८१ शाळांमध्ये १८१ स्मार्ट टेलिव्हिजन आणि शैक्षणिक संकल्पनांवर आधारित उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या स्मार्ट टेलिव्हिजनच्या माध्यमातून गणित आणि इंग्रजी भाषेतील संकल्पना चलचित्रपटाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी प्रत्येक शाळेतून एका शिक्षकाची निवड करण्यात आली असून, प्राथमिक विभागातील शिक्षकांना या प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात आले आहे.





