मुंबई : पुढील काही तासांत मुंबई शहर, तसेच उपनगरात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अनेक भागात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. अजूनही काही भागात पाऊस कोसळत आहे. पुढील एका तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, पश्चिम उपनगरात पुढील तासाभरात सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी शहर तसेच उपनगरात बऱ्यापैकी जोरदार पाऊस पडला. काही भागात मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, मुंबईत आज सकाळपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही भागात हलक्या सरी बरसत आहेत. पुढील एका तासात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने पश्चिम उपनगरात पावसाचा जोर असेल. शहराच्या तुलनेत वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली या भागात सर्वाधिक पाऊस पडेल. द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यंदा मोसमी पाऊस अंदाजित वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी तळकोकणात मोसमी पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. यंदा १५ दिवस अगोदरच मोसमी पाऊस दाखल झाला आहे. सामान्यतः मुंबईत १० जूननंतर पावसाळा सुरू होतो.







