ठाणे : घोडबंदर मार्गावरील मानपाडा भागात ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारे अवजड वाहन उड्डाणपूलाच्या कठड्याला धडकल्याने शनिवारी मानपाडा ते कासारवडवली मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सकाळी १०.३० नंतरही ही कोंडी कायम होती. त्यामुळे घोडबंदरहून कामानिमित्ताने ठाणे, मुंबईत जाणाऱ्या चालकांचे हाल झाले. अनेकांनी पर्यायी मार्गाने वाहतुक सुरु केली होती. त्यामुळे पर्यायी मार्गावरही कोंडी झाली होती.
घोडबंदर मार्गावर मागील काही वर्षांत नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे. तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ही मार्गिका देखील महत्त्वाची आहे. घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे आणि सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलणीकरणाचे काम सुरू आहे. या कामांमुळे दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत असतो. शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतक करणारा कंटेनर अचानक मानपाडा येथील उड्डाणपूलाच्या कठड्याला धडकला. घटनेची माहिती ठाणे वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे मानपाडा ते कासारवडवली पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.





