पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा ऊन तर नंतर पावसाचे आगमन होताना दिसत आहे. मंगळवारी पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले. शहरात दुपारनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. जोरदार वाऱ्यांमुळे काही ठिकाणी झाडे पडली तर, सखल भागांत निचरा न झाल्याने पाणी साठून राहिले होते.
पुणे वेधशाळेने हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पुढील सहा दिवस आकाश ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात दिवसभराच्या उकाड्यानंतर दुपारनंतर आभाळ ढगाळ होऊन पावसाला सुरुवात झाली. याचबरोबर जोरदार वारेही वाहत होते. पावसामुळे रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले. पाण्याचा निचरा न झाल्याने महापालिकेने केलेल्या पावसाळी गटारांच्या सफाईच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.







