मुंबई : हवामान विभागाने मुंबईसह ठाणे पालघर भागात आज सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. काही भागात आज दिवसभरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. याचबरोबर सायंकाळपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार ते बुधवार या कालावधीत शहर, तसेच उपनगरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, मुंबईत आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची, तर काही भागात गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यावेळी वारे ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहतील. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार,कोकण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम बंगालपासून झारखंड, विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमापर्यंत, तसेच विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक, केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.







