पुणे : जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काश्मीरमधील पहलगाम या लोकप्रिय पर्यटनस्थळावर हल्ला करुन २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये धर्म विचारुन बेछुट गोळीबार करण्यात आला. पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्याबाबत संपूर्ण देशातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भारताने देखील पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तान जगाच्या नकाशावरून कायमचा नष्ट करावा अशी आक्रमक भूमिका मनसे पक्षाने घेतली आहे.
पहलगाम हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये ६ जण हे महाराष्ट्रातील आहे. पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुण्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या परिवारासह संपूर्ण शहरातून नागरिकांनी भावपूर्ण निरोप दिला. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मनसे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते. यानंतर त्यांनी पहलगाम हल्ल्याच्य़ा भारताने बदला घ्यावा असे वक्तव्य केले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “पहलगाममध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या पुण्यातील दोघांच्या अंत्यसंस्काराला मी वैकुंठला गेलो होतो. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या अंत्यविधीला मी उपस्थित होतो. जगदाळेंची मुलगी आसावरी हिला देखील भेटलो. त्यांनी हल्ल्यावेळी झालेली घटना आणि माहिती सांगितली ती ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी एवढंच सांगू इच्छितो की, भारतातील आता सर्वच लोकांनी एकत्रितपणे येऊन या पाकिस्तान नावाचा देश जगाच्या इतिहासावरुन मिटवला पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका मनसे नेते बाळी नांदगावकर यांनी घेतली आहे.







