मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही भागात शुक्रवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी बरसल्या. दक्षिण मुंबईतील काही परिसरात आणि विशेषतः मध्य उपनगर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात पावसाची नोंद झाली. ढगांच्या गडगडाटासह काही भागांत सरी कोसळल्या. तरीदेखील, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असले तरी, मुंबईत पावसाबाबात अजूनतरी हवामान विभागाने कोणताही अंदाज व्यक्त केलेला नाही.
मुंबईत शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. उन्हाचा तडाखाही कमी होता. यामुळे उकाड्यापासून किंचित दिलासा मिळाला. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री कांजूरमार्ग, मुलुंड, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पनवेल भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे रात्री वातावरणात हलकासा गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईसाठी पावसाचा अंदाज वर्तवला नव्हता. हा पूर्वमोसमी पाऊस असून एप्रिल ते मे या कालावधीत पूर्वमोसमी पाऊस अनेक भागात पडतो.







