पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठांना लुटणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने अटक केली. चोरट्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याने शहराच्या वेगवेगळ्या भागासह सासवड परिसरात गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरट्याकडून साडेसात लाख रुपयांचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हमीद अफसर खान (३०, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या चाेरट्याचे नाव आहे.
पुणे शहर, तसेच परिसरात पादचारी ज्येष्ठ नागरिकांकडे पोलीस असल्याची बतावणी करून त्यांना लुटण्याचे गुन्हे घडले होते. पोलीस असल्याची बतावणी करून खान याने ज्येष्ठांकडील दागिने चोरून नेले होते. या गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडून करण्यात येत होता. ज्येष्ठांना लूटणारा चोरटा हमीद खान हा लोणी काळभोर परिसरातील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत खान आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याची कबुली दिली. खान आणि साथीदाराने पर्वती, कोथरूड, कोंढवा, सिंहगड रस्ता, भारती विद्यापीठ, तसेच सासवड परिसरात लूटमारीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून सात लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दुचाकी असा आठ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन घाडगे, शेखर काटे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती नरवडे यांनी ही कामगिरी केली.







