मुंबई : वरळी ते नरिमन पॉइंटदरम्यानच्या किनारा मार्गावर गेल्या महिन्याभरात हॉर्न वाजविणाऱ्या ३८८३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही आकडेवारी समोर आली आहे. किनारा मार्गावरील काही ठिकाणं शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी मुंबई महापालिकेलाही कळविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. म्हणजेच या रस्त्यावर रोज हॉर्न वाजवणारे १३० मुंबईकर पकडले जातात. मुंबईत रात्रीच्या वेळी चालविण्यात येणाऱ्या रेसिंग कार व इतर वाहनांचे कर्णकर्कश आवाज व हॉर्नमुळे सागरी किनारा मार्गालगतच्या वरळी, नेपियन सी रोड, ब्रीच कँडी परिसरातील रहिवासी तसेच, तेथील रुग्णालयातील रुग्णांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होत असल्याबाबत आमदार मिलिंद नार्वेकर आणि सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याला मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी सहआयुक्त, वाहतूक पोलिस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.
‘रेसिंग कार व इतर वाहनांचे कर्णकर्कश आवाजातील हॉर्नमुळे कोस्टल रोडलगतच्या वरळी, नेपियन सी रोड, ब्रीच कँडी परिसरातील रहिवासी तसेच, रुग्णालयातील रुग्णांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होत असल्याबाबत अर्ज ई-मेलद्वारे वाहतूक पोलिसांना पाठविण्यात आला होता. कोस्टल रोडवर नेमून दिलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकरिता तीन इंटरसेप्टर वाहनांची नेमणूक करण्याचे आले आहेत,’ असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे वेगवेगळे नियम मोडणाऱ्या चालकांवर नेमकी कोणती कारवाई केली, याची माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आरटीआय अंतर्गत माहिती मिळवली आहे. वाहतूक पोलिसांनी जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, विना हेल्मेट, सिग्नल तोडणे, नो एंट्री, एक दिशा मार्गात वाहन चालविणे, मर्यादेपेक्षा अधिक वेग, लायसन्स शिवाय वाहन चालविणे, स्टॉप रेषेपुढे वाहन उभे करणे, सीटबेल्ट न लावता वाहन चालविणे, ट्रिपल सीट, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, विनाकारण हॉर्न वाजविणे, बेदरकारपणे वाहन चालविणे अशा सुमारे २६ प्रकारचे नियम मोडल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ महिन्यांत ६५ लाख १२ हजार ८४६ वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ५२६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी केवळ १५७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.





