विरार : पश्चिम रेल्वेवरील वसई, नालासोपारा, मिरा रोड ही रेल्वे सर्वात गर्दीची स्थानके बनत चालली असून येथे अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. २०२४ या वर्षात वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २२७ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यापैकी रुळ ओलांडताना १२८ जणांचा तर गर्दीमुळे ट्रेन मधून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिमे रेल्वेची वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या अखत्यारित मिरा रोड, भाईंदर, नायगाव, वसई, नालासोपारा, विरार आणि वैतरणा अशा रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. वसई विरार मध्ये लोकसंख्या वाढत असल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दररोज लाखो प्रवासी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल ट्रेन मधून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. त्यामुळे मिरा रोड, भाईंदर, नालासोपारा, विरार ही स्थानके प्रचंड गर्दीची ठरू लागली आहेत.
विरार बोरीवली दरम्यान चार मार्गिका तयार करण्यात आली असून लोकल ट्रेन गाड्यांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. मात्र सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून ट्रेनमधून लटकून प्रवास करावा लागत आहे. परिणामी ट्रेन मधून खाली पडून प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे. २०२४ या वर्षात वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५० प्रवाशांचा तर पालघरच्या हद्दीत २३ जणांचा ट्रेनमधून खाली पडून मृत्यू झाला होता. पालघर आणि वसईत एकूण ८३ प्रवाशांचा धावत्या ट्रेनमधून खाली पडून मृत्यू झाला होता. त्यात १० महिला आणि ६३ पुरूष प्रवाशांचा समावेश आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.





