मुंबई : मागील महायुती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली प्रसिद्ध झाली आहे. अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज केले असून, त्याचे पैसेही खात्यात आले आहेत. असे असताना आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांना स्वतः हून नावे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगण्यात येत आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरु होणार असल्याची चर्चा होती. मात्र, फक्त तक्रारी आल्यास तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल, असे महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर आता महिला व बालकल्याण विभागाने याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेत निकषात न बसणाऱ्या महिलांना एकतर स्वतः हून नाव बाद करा किंवा पैसे भरावेत, असे सांगण्यात आले आहे. अपात्र असलेल्या महिलांना योजनेतून नाव कमी करावे किंवा महिला व बालकल्याण विभागाच्या लेखाशिर्षावर पैसे भरावेत, अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी केली आहे.
लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. त्यानंतर आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट महिला पाहत आहे. अशातच आता अपात्र लाडक्या बहिणींना स्वतः हून अर्ज बाद करण्यास सांगितले आहे. दरम्यान, आता ज्या महिला निकषात बसत नाही त्यांनी नाव मागे घ्यावेत किंवा ती रक्कम दंडासहित वसून केली जाईल, असे वक्तव्य छगन भुजबळांनी केले होते. त्यानंतर अपात्र लाडक्या बहिणींना दंड भरावा लागणार असल्याची चर्चा सुरु होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात १५००रुपये जमा करणाऱ्या महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांच्या खात्यात १५००रुपये जमा केले जात होते. पण आता या योजनेला काही निकष लावण्यात आले आहेत. या निकषांमुळे अनेक अपात्र महिलांची नावे वगळली जाणार आहेत. यासंदर्भात महिला व बालकल्याण विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.







