मुंबई : बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करत वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना मुंबई सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. येथील विशेष एनआयए न्यायालयाने बांगलादेशी नागरिकांना भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणे, बनावट कागदपत्रे बाळगणे आणि भारतातील दहशतवादी संघटनांना मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवत पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. अनेक बांगलादेशी नागरिक वैध कागदपत्रांशिवाय वास्तव्य करत असल्याचे आढळून आले, तसेच ते बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या ‘एबीटी’च्या सदस्यांना मदत करत होते.
मोहम्मद हबीबुर रहमान हबीब उर्फ राज जेसूब मंडल, हन्नान अन्वर हुसेन खान उर्फ हन्नान बाबुरअली गाझी आणि मोहम्मद अझरअली सुभानल्ला उर्फ राजा जेसूब मंडल अशी या आरोपींची नावे आहेत. एनआयए कोर्टाने दोषी ठरवलेल्या प्रत्येक आरोपीला दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, आणखी काही घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.





