मुंबई : भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांमध्ये सातत्याने पाऊस पडत असल्याने नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. त्यामुळे पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पाण्याचा गढूळपणा कमी करण्यासाठी पालिका जल अभियंता विभागामार्फत जलशुद्धीकरण केंद्रामध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येत आहे. पाणी निर्जंतुकीकरणाकामी क्लोरीनचा देखील पुरेसा वापर केला जात आहे. नागरिकांनी गढूळ पाणीपुरवठा झाल्यास घाबरून जाऊ नये. गढूळ पाणी प्राप्त झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.





