मुंबई : लिव्ह ॲण्ड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यासोबत वाद झाल्याने कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यासंदर्भात माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या नेहरू नगर पोलिसांना या तरुणीचे प्राण वाचवले.
कुर्ल्यातील नेहरू नगर परिसरात ही घटना घडली आहे. सदर ३५ वर्षीय महिला तिच्या मित्रासोबत म्हाडा इमारतीमध्ये राहते. दोघांमध्ये वाद झाल्याने तिने खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी तिच्या मित्राने याची माहिती नेहरू नगर पोलिसांना दिली. नेहरू नगर पोलिसांचे निर्भया पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेला अडवले. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून तिचे समुपदेशन करण्यात आले. निर्भया पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे या महिलेचे प्राण वाचले.





