मुंबई : निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादीत नव्यानं ९६ लाख बोगस मतदार घुसवले आहेत, असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. मला असं कळालं की, १ जुलैला निवडणूक आयोगाने मतदारांची यादी बंद केली. त्यानंतर महाराष्ट्रात मतदारांच्या यादीत ९६ लाख खोटे मतदार भरले आहेत, अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचं राज ठाकरे यांनी म्हटले. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे अशा सर्व शहरांमध्ये तब्बल आठ ते साडेआठ लाख मतदार घुसवण्यात आले आहेत. प्रत्येक शहरात आणि गावातील याद्यांमध्ये हे खोटे मतदार घुसवण्यात आले आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईतील नेस्को मैदानावर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला, “आम्ही निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले की सत्ताधाऱ्यांना मिरच्या का लागतात? ते उत्तर द्यायला पुढे का येतात? मुळात आम्ही जे आज बोलतोय तेच हे सत्ताधारी काही वर्षांपूर्वी बोलत होते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक आयोगाला इशारे देत होते.” “निवडणूक आयोगाला आमचं सांगणं आहे की सगळं स्वच्छ होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका. मतदार याद्यांमधील दुरुस्त्यांसाठी आणखी एक वर्ष गेलं तरी चालेल. परंतु, मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय महाराष्ट्रात निवडणुका होता कामा नयेत. सत्ताधाऱ्यांची निवडणुका घेण्याची घाई चालली आहे. कारण त्यांनी खोटे मतदार पेरून निवडणुका जिंकण्याची सगळी तयारी केली आहे,” असा आरोप राज ठाकरे यांनी सत्ताधाऱयांवर केलाय.







