पुणे : पुणे मेट्रोला यंदा गणपती बाप्पा पावला असून गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात नऊ लाख ६१ हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. त्यामधून मेट्रोला एक कोटी ४० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाल आहे. तर, विसर्जनाच्या दिवशी पुणे मेट्रोने प्रवासी वाहतुकीचा नवीन उच्चांक केला आहे. या दिवशी मेट्रोतून तब्बल एक लाख ६३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोकडून रात्री बारापर्यंत सेवा सुरू ठेवली होती. तर, विसर्जनाच्या दिवशी पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू होती. मेट्रोला उत्सव काळात आणि विसर्जनाच्या दिवशी प्रवाशांचा तुफान प्रतिसाद लाभल्याचे दिसून आहे. दोन्ही मार्गावरून प्रवाशांनी मेट्रोला भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या दोन दिवसांमध्ये मेट्रोतून तीन लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे. विसर्जनाच्या दिवशी मेट्रोला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे दिसून आले. रात्रीच्या वेळी सर्व गाड्या तुडूंब भरून जात होत्या.
विसर्जनाच्या दिवशी सकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्यात आली होती. विसर्जनाच्या दिवशी प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे. या दिवशी एक लाख ६३ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामधून २५ लाख ५८ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या पूर्वी विसर्जनाच्या अगोदरच्या दिवशीच एक लाख ३५ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. तो उच्चांक विसर्जनाच्या दिवशी मोडल्याचे दिसून आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांचा मेट्रोच्या सेवेला प्रतिसाद वाढत असल्याचं चित्र आहे. पुणे मेट्रोला अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील प्रवाशांनी विक्रमी प्रतिसाद दिल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.