मुंबई : मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर कथित लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पीडित बालिका आणि संशयित आरोपी हे एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. बालिका एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिच्यावर कथित अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर बालिकेने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता निर्मल नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच निर्मल नगर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला. पोलिसांच्या विशेष पथकाने परिसरात शोधमोहीम राबवत काही तासांतच संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बालकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची तसेच अशा गुन्ह्यांतील आरोपींवर जलद आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास निर्मल नगर पोलीस करत असून, पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबाला आवश्यक कायदेशीर व समुपदेशनाची मदत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.






