ठाणे : कळव्यातील खासगी शाळा सहकार विद्यालयात पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. दुपारच्या जेवणात मटकीची आमटी आणि भात खाल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. यानंतर सर्व मुलांना तातडीने ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरानी दिली आहे.
शासनाकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो. या शालेय पोषण आहारात मुखत्वे करून खिचडी दिली जाते. कळवा येथील सहकार विद्यालयात दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना आहारात मटकीची आमटी आणि भात देण्यात आला होता. मात्र मटकीला वास येतं असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या. ही आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्याचा त्रास सुरु झाला. शाळेतून कळवा रुग्णालयाला माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने रुग्णवहिका पाठवून ३८ मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. दाखल करण्यात आलेले विद्यार्थी हे पाचवी आणि सहावीचे विद्यार्थी असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान मुलांना देण्यात आलेली आमटीमधून मटकीचा वास येत असल्याने या संपूर्ण प्रकारानंतर पालक संतप्त झाले आहेत.