पुणे : कोथरूड भागातील दोन व्यक्तींना सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या थापा मारत तब्बल ३८ लाख ५६ हजार रुपयांना गंडा घातला आहे. एकाला शेअर ट्रेडींगमार्फत जास्त नफा देण्याचे आमिष दाखविले गेले तर दुसऱ्या व्यक्तीला प्राईमरी मार्केट अॅक्सेस उपलब्ध करून देत अप्पर व लोअर सक्रिट व आयपीओमध्ये गुंतवणूकीचे आमिष दिले होते. त्यानूसार ही फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पहिल्या घटनेत ४७ वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानूसार, केवल जोशी, साक्षी सिंग अशी नावे सांगणाऱ्यासह टेलिग्राम आयडी धारक व इतरांवर आयटी अॅक्ट व फसवणूकीचा गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार ५ मे ते ९ जुलै २०२४ या कालावधीत घडला आहे. तक्रारदार खासगी कंपनीत नोकरीस आहेत. दरम्यान, त्यांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडींगमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यांनी स्वत:च्या व पत्नीच्या खात्यावरून एकूण १८ लाख ३७ हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत.
दुसऱ्या घटनेत ४८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यावरून कोथरूड पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुप व अॅपचे खातेधारक यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार हॉस्पीटलमध्ये नोकरीस आहेत. दरम्यान, त्यांना सायबर चोरट्यांनी प्राईमरी मार्केट अॅक्सेस उपलब्ध करून दिले. त्यांना अप्पर व लोअर सक्रिट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणूक केल्यास त्यांना प्रथम ६० हजार रुपये देत विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यावर एकूण २० लाख १८ हजार रुपये भरण्यास भाग पाडत फसवणूक केली. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक संदिप देशमाने हे करत आहेत.