धुळे प्रतिनिधी : शनिवारी धुळे जिल्हा दौ-यावर आलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांना शिवसैनिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. सामंत यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही आठवड्यांपूर्वीच सामंत यांच्या गाडीवर पुण्यामध्ये कथित शिवसेना समर्थकांनी हल्ला केला होता. त्यानंतर आज धुळ्यामध्ये हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सामंत यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार शरद पाटील, अतुल सोनवणे, धीरज पाटील यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सामंत यांच्या कारवर २ ऑगस्ट रोजी शिवसैनिकांनी कात्रज चौकात हल्ला केला होता. दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फोडली. कात्रज भागात सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा याच दिवशी सायंकाळी पार पाडली.
सामंत कात्रज चौकातून कारने जात असताना शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आणि सामंत यांची कार अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गर्दीत एकाने सामंत यांच्या कारवर दगड फेकल्याने काच फुटली. सामंत यांच्या मोटारीवर हल्ला झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसैनिकांनी सामंत यांच्या कारला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने सामंत यांच्या कारला वाट करुन दिली. या घटनेमुळे कात्रज चौकात तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, राजेश पळसकर, संभाजी थोरवे, सूरज लोखंडे, चंदन साळुंके यांना अटक करण्यात आली आहे.