मुंबई : केंद्र सरकारने प्रारंभिक बाल्यावस्था देखभाल आणि शिक्षणअंतर्गत सुरू केलेल्या ‘पोषण भी, पढाई भी’ या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना उत्तम पोषण आहार आणि शिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पोषण जनजागृती संदर्भातील विविध उपक्रमात महाराष्ट्र देशात कायमच अव्वल राहिला आहे, असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे ‘पोषण भी, पढाई भी’ या राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार, ‘एनआयपीसीडी’चे उपसंचालक रिटा पटनाईक, सहव्यवस्थापक सिद्धांत सचदेवा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी सुरुवातीच्या काळात मिळेल त्या जागेवर अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आई – वडिलांच्या बरोबरीनेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बालकांवर संस्कार करत असतात. महिला व बालकांना उत्तम शिक्षण आणि पोषण देण्याचे काम महिला व बालविकास विभाग करत आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये सेविका, मदतनीस यांनी महत्त्वाची सेवा बजावली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्य शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. केंद्र शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंतीही त्यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली.
केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर म्हणाल्या, पोषण अभियान हा देशातील ६ वर्षांखालील लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांचे पोषण सुधारण्यासाठीचा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. पोषण माह २०२४ अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत ७ कोटी ९३ लाख विविध उपक्रम यशस्वीरित्या आयोजित करून एकत्रित प्रयत्नांतून कुपोषणावर मात करण्यासाठी पोषण अभियानाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केले आहे. पोषण भी, पढाई भी या माध्यमातून ‘स्वस्थ भारत’चे स्वप्न साकार करण्यासाठी महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात गर्भवती आणि स्तनदा माता, सहा वर्षांखालील लहान मुले आणि किशोरवयीन मुलींवर विशेष लक्ष केंद्रित करून पोषणविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. असेही केंद्रीय राज्यमंत्री ठाकूर यांनी सांगितले. आयुक्त कैलास पगारे म्हणाले, महिला व बालकांच्या आहारासंदर्भात असलेले गैरसमज दूर व्हावे, महिलांनी बालकांच्या पोषणासाठी काय काळजी घेतली पाहिजे. यासंबंधी माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबवून ‘पोषण माह’ साजरा करण्यात येत आहे. हा ७ वा राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात येत आहे. या अभियानात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली. दरम्यान बालमंथन या मासिकाचे आणि नवचैतन्य या अभ्यासक्रमाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.