नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, टेलिग्रामसह विविध मेसेजिंग अॅप्स वापरणाऱ्या कोट्यवधी मोबाईलधारकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. दूरसंचार विभागाने (DoT) मेसेजिंग अॅप्समध्ये ‘सिम-बाइंडिंग’ नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२७ पासून संबंधित अॅपवर नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाशी संबंधित सक्रिय सिम कार्ड त्याच डिव्हाइसमध्ये असणे आवश्यक ठरू शकते. या निर्णयामागचा मुख्य उद्देश सायबर गुन्ह्यांवर आळा घालणे हा आहे. सध्या अनेक अॅप्सवर एकदा मोबाईल क्रमांकाची पडताळणी झाल्यानंतर सिम कार्ड फोनमधून काढले तरी वाय-फायद्वारे खाते वापरता येते. मात्र, नव्या नियमांनुसार सक्रिय सिम कार्ड नसल्यास अशा खात्यांच्या वापरावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.
सायबर फसवणूक, फिशिंग, बनावट ओळख आणि ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या गुन्ह्यांमध्ये भारतीय मोबाईल क्रमांकांचा गैरवापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. व्हॉट्सॲप, टेलिग्राम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जोश, जिओचॅट आणि इतर काही मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर या नियमांचा परिणाम होऊ शकतो. जर नोंदणीकृत क्रमांकाचे सिम दुसऱ्या फोनमध्ये असेल, तर मूळ डिव्हाइसवरील अॅपच्या वापरात अडथळे येऊ शकतात. ड्युअल-सिम किंवा ई-सिम वापरणाऱ्यांनीही संबंधित मोबाईल क्रमांक सक्रिय ठेवणे आवश्यक ठरू शकते. मात्र, हा नियम कोणत्याही विशिष्ट अँड्रॉइड किंवा आयफोन मॉडेलवर बंदी घालणारा नसून केवळ मोबाईल क्रमांक आणि सक्रिय सिम पडताळणीशी संबंधित आहे. त्यामुळे वापरकर्त्यांनी घाबरून न जाता अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे आणि आपला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सक्रिय ठेवावा.

