मुंबई : मुंबईतील कोळी समाजाने बेस्ट प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली असून, एसी बसमध्ये मासेविक्रेत्या महिलांना प्रवेश नाकारला जात असल्याचा आरोप केला आहे. मासेमारी आणि मासेविक्री हा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या अनेक महिला दररोज पहाटे ससून डॉकवरून मासे खरेदी करून शहरातील विविध बाजारांमध्ये विक्रीसाठी जातात. यासाठी त्या अनेक वर्षांपासून बेस्ट बसचा वापर करत आहेत. मात्र, बहुतांश बस वातानुकूलित झाल्यानंतर मासे आणि दुर्गंधीचे कारण देत बसमध्ये चढू दिले जात नसल्याचा दावा महिलांनी केला आहे. विशेषतः ए-५१, ए-५६ आणि ए-२०० या मार्गांवर ही समस्या अधिक गंभीर झाल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी, अनेक महिलांना शेअर टॅक्सी किंवा इतर महागड्या वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागत असून त्यांच्या रोजच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.
दुसरीकडे, बेस्ट प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मासे योग्य प्रकारे बंद कंटेनरमध्ये ठेवले असतील आणि इतर प्रवाशांना त्रास होत नसेल, तर मासेविक्रेत्यांना प्रवास करण्यास कोणतीही मनाई नाही. मात्र, पाणी गळणाऱ्या टोपल्या किंवा इतर प्रवाशांची गैरसोय होईल अशा परिस्थितीतच निर्बंध लागू केले जातात. कोळी महिलांनी हा दावा नाकारत, मासे नसतानाही बसमध्ये प्रवेश नाकारल्याच्या घटना घडल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली असून, बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनीही प्रत्येक नागरिकाला सार्वजनिक वाहतुकीचा समान अधिकार असल्याचे सांगत तक्रारींची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

