हिंदू धर्मात श्रीगणेशाला विशेष स्थान आहे. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. बुद्धी, विद्या आणि विघ्नांचे हरण करणारा देव म्हणून गणपतीची ओळख आहे. वर्षातून गणपतीच्या जन्माशी संबंधित वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. त्यापैकीच एक महत्त्वाचा सण म्हणजे माघी गणेश जयंती, जी माघ महिन्यात साजरी केली जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. संक्रांतीनंतर वातावरणात एक वेगळाच उत्साह जाणवतो आणि अनेक ठिकाणी माघी गणपतीची तयारी सुरू होते. भाद्रपद महिन्यातील सार्वजनिक गणेशोत्सव जितका मोठ्या प्रमाणात साजरा होतो, तितकाच गाजावाजा माघी गणपतीला नसला तरी धार्मिक दृष्टिकोनातून या सणाचे महत्त्व खूप मोठे मानले जाते. माघी गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी किंवा विनायकी चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये तीळ आणि गूळ यांना विशेष स्थान आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवात उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून दाखवले जातात, तर माघी गणपतीला तीळ-गूळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करण्याची परंपरा आहे. तीळ हे शुद्धतेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते.
पुराणांनुसार, गणपतीने पृथ्वीवरील दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी वेगवेगळे अवतार घेतले असल्याचे सांगितले जाते. माघ शुक्ल चतुर्थीला घेतलेला अवतार विशेष मानला जातो. या दिवशी गणेशाने नरांतक नावाच्या राक्षसाचा वध केल्याची कथा पुराणात आढळते. त्यामुळेच माघी गणेश जयंतीला विजय, संरक्षण आणि विघ्ननाशाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात. सकाळी स्नान करून गणपतीची यथासांग पूजा, मंत्रजप, आरती आणि नैवेद्य अर्पण केला जातो. काही ठिकाणी धुंडीराज व्रत करण्याची परंपरा आहे. घरी एकदिवसीय गणपतीची स्थापना करून दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. काही शहरांमध्ये माघी गणपती सार्वजनिक स्वरूपातही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, माघ शुद्ध चतुर्थीला गणेश तत्त्व अधिक प्रभावी असते. या दिवशी श्रद्धेने केलेली गणेश आराधना संकटांपासून संरक्षण देते आणि कार्यसिद्धी प्राप्त होते, असा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळेच आजही अनेक घरांमध्ये परंपरेने माघी गणपती मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. एकूणच, माघी गणेश जयंती हा केवळ एक सण नसून श्रद्धा, संयम आणि आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो. शांततेत, भक्तीभावाने साजरा होणारा हा उत्सव गणपती बाप्पाच्या कृपेसाठी खास मानला जातो.






