मुंबई : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची संख्या वाढल्याने विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने ‘ऑपरेशन दीप’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत मुंबई विभागातील स्थानके आणि रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करणारे, आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश करणारे तसेच चुकीच्या श्रेणीतील डब्यांत प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाई करून दंड वसूल केला जाणार आहे. वाढत्या गर्दीमुळे वैध तिकीटधारक प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी नियमित तपासणीबरोबरच अचानक धाडी, सापळा कारवाया आणि विशेष पथकांच्या माध्यमातून व्यापक तपासणी केली जाणार आहे. ‘ऑपरेशन दीप’मध्ये ‘डी’ म्हणजे विनातिकीट प्रवाशांचा शोध, ‘ई’ म्हणजे तिकिटांची तपासणी, दुसरे ‘ई’ म्हणजे रेल्वे नियमांची अंमलबजावणी आणि ‘पी’ म्हणजे नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, अशा चार टप्प्यांवर भर दिला जाणार आहे.
तपासणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी पश्चिम रेल्वेने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना बॉडी-वॉर्न कॅमेरे आणि विशेष काळ्या रंगाची जॅकेट उपलब्ध करून दिली आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात १५ बॉडी कॅमेरे आणि ३० जॅकेट देण्यात आली असून हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला जात आहे. यामुळे तपासणीदरम्यान होणारे वाद कमी करण्यास आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला मदत होईल, असा रेल्वे प्रशासनाचा विश्वास आहे. याशिवाय स्थानक तपासणी, फोर्ट्रेस चेक, मेगा तिकीट तपासणी, अचानक धाडी आणि मेल, एक्स्प्रेस तसेच विशेष गाड्यांमध्येही तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. रेल्वे कायद्यानुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून किमान ५०० रुपयांचा दंड आकारला जात असल्याने प्रवाशांनी प्रवासापूर्वी वैध तिकीट घेण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

