पुणे : पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन आणि फेज-२ प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी ते हिंजवडी फेज-२ या नव्या मार्गावर मेट्रोने प्रवास केला. या मार्गावरील पहिले तिकीट स्वतः खरेदी करून मुख्यमंत्र्यांनी मेट्रो सेवेला प्रतीकात्मक सुरुवात केली. प्रवासादरम्यान पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी नव्या मार्गाची रचना, स्थानकांची वैशिष्ट्ये आणि प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रवासाचे विशेष आकर्षण म्हणजे संपूर्ण मेट्रोचे संचालन महिला ट्रेन पायलटांकडे होते. लीड ट्रेन पायलट प्रगती बिरादार यांनी मेट्रोचे सारथ्य केले, तर ट्रेन पायलट ऐश्वर्या सूर्यपूजारी यांनीही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षम सहभागातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. सुमारे सहा किलोमीटरच्या प्रवासादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी शाळकरी विद्यार्थिनी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि इतर प्रवाशांशी संवाद साधत मेट्रोमुळे होणाऱ्या सोयी, प्रवासातील बदल आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. हिंजवडी फेज-२ स्थानकापर्यंत झालेला हा पहिला प्रवास महिला सक्षमीकरण, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांशी थेट संवाद या तिन्ही कारणांमुळे विशेष ठरला.

