मुंबई : ऑन-डिमांड सेवा देणाऱ्या स्विगीने इंडसइंड जनरल इन्शुरन्स कंपनीसोबत डिलिव्हरी पार्टनर्ससाठी असलेल्या सर्वसमावेशक विमा योजनेचे नूतनीकरण केले आहे. या उपक्रमाद्वारे गिग वर्कफोर्सची आर्थिक सुरक्षितता, आरोग्यसेवा आणि सामाजिक संरक्षण अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये २५ लाखांहून अधिक डिलिव्हरी पार्टनर्सना या योजनेचा लाभ मिळाला आहे. नव्या योजनेनुसार अपघाती मृत्यूसाठी १० लाख रुपयांचे विमा संरक्षण, रुग्णालयीन उपचारांसाठी २ लाख रुपयांपर्यंतचे कवच आणि कुटुंबासाठी १ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा उपलब्ध राहणार आहे. महिला डिलिव्हरी पार्टनर्स तसेच पुरुष पार्टनर्सच्या पत्नींनाही प्रसूतीसाठी विमा लाभ मिळणार असून, मागील वर्षी अशा दाव्यांपैकी ७५ टक्के लाभ पार्टनर्सच्या पत्नींनी घेतला होता. याशिवाय अपघाती अपंगत्व, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत, कॅशलेस उपचार, डे-केअर सुविधा आणि आधीपासून असलेल्या आजारांनाही पहिल्या दिवसापासून संरक्षण देण्यात येणार आहे.
या विमा योजनेत बाह्यरुग्ण (ओपीडी) उपचार, आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी व नंतरचा उपचार खर्च, उत्पन्नातील नुकसानीसाठी आर्थिक मदत आणि मोबाईल विम्याचाही समावेश आहे. स्विगी डिलिव्हरी पार्टनर ॲपद्वारे विमा लाभ आणि दावे सहजपणे करता येणार आहेत. तसेच सर्व डिलिव्हरी पार्टनर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांना जनरल फिजिशियन व सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून २४ तास मोफत टेलिकन्सल्टेशन, औषधे व वैद्यकीय तपासण्यांवर सवलत, एआय आधारित आरोग्य व्यवस्थापन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. स्विगीचे फूड मार्केटप्लेस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव गोयल यांनी ही योजना गिग इकॉनॉमीतील सर्वसमावेशक सुरक्षा उपक्रमांपैकी एक असल्याचे सांगत, डिलिव्हरी पार्टनर्स आणि त्यांच्या कुटुंबांना अधिक सक्षम संरक्षण देण्याची कंपनीची बांधिलकी कायम असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच विविध शहरांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक व्यापक करण्याचाही कंपनीचा मानस आहे.

