मुंबई : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या रेल्वे स्थानकाचा थांबा रद्द असेल. जलद मार्गावरील फलाट उपलब्ध नसल्याने मेगाब्लाॅकमध्ये या तीन रेल्वे स्थानकांवर लोकल थांबा नसेल.
मध्य रेल्वेमुख्य मार्ग :
कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. तर, नियोजित वेळेनुसार १५ मिनिटे उशिराने लोकल इच्छित स्थानकात पोहोचतील. ठाणे येथून सकाळी ११.७ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल, मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल मुलुंड ते माटुंगादरम्यान मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील. त्यानंतर माटुंगा येथे पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि निर्धारित स्थानकावर या लोकल नियोजित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.







