मुंबई : विदेशी चलनाच्या बदल्यात भारतीय चलन देण्याचे आमिष दाखवून १५ लाखांचे विदेशी चलन घेऊन पळून गेलेल्या दोघांना अटक करण्यात वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) पोलिसांना यश आले. गुरुकुमार उपेंद्र सहानी आणि मृत्यूजंय विजयकुमार गर्ग अशी या दोघांची नावे आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. तक्रारदार गंगासिंह राजूसिंह परमार हा मूळचा राजस्थानमधील रहिवाशी असून तो त्याच्या मित्रासोबत अंधेरीतील चकाला परिसरात राहतो. या दोघांचा विदेशी चलनाचा व्यवसाय आहे. त्यांना ३ जुलै रोजी एक दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्याने त्याचे आपले नाव गौरव साहू असल्याचे सांगितले. आपण विदेश चलन कंपनीत दलाल म्हणून काम करीत असून आपल्याला १२ हजार अमेरिकन डॉलर्स आणि चार हजार पाऊंड हवे आहेत. त्याच्या बदल्यात चांगली किंमत देण्यात येईल, असे त्याने सांगितले. तसेच हा व्यवहार वांद्रे येथील बीकेसीमध्ये करण्यात येईल असेही त्याने सूचित केले. त्यामुळे गंगासिंह विदेशी चलन घेऊन बीकेसी येथील जी ब्लॉक, इनस्पायर परिसरात गेला. यावेळी त्याला गौरव साहू भेटला, त्याच्यासोबत अन्य एक तरुण होता. तिथेच आपले एक कार्यालय असल्याचे सांगून त्याने त्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर गोरवने गंगासिंहकडून १५ लाख १२ हजार रुपयांचे विदेशी चलन घेतले. यावेळी त्याने गंगासिंहला कागदपत्रांची पाहणी करून घ्या, तोपर्यंत मालकाला विदेशी चलन दाखवून आणतो असे सांगितले. काही वेळानंतर गौरव साहू तेथून निघून गेला आणि परत आला नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर गंगासिंहने त्याला दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाइल बंद होता. संबंधित कार्यालयाची चौकशी केली असता आरोपींनी ते दोन तासांसाठी भाडे तत्त्वावर घेतल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गंगासिंह यांनी याप्रकरणी बीकेसी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. शोधमोहीम सुरू असताना आरोपी गुरुकुमार सहानी आणि मृत्यूजंय गर्ग यांना पोलिसांनी अटक केली.