वृत्तसंस्था : भारतातील चलन व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याच्या दिशेने भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. १ एप्रिल २०२७ पासून १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर (प्लास्टिक) नोटांचा प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. या नोटांचा आकार सध्याच्या कागदी नोटांप्रमाणेच ठेवण्यात येणार असल्याने बँकांना एटीएममध्ये कोणतेही तांत्रिक बदल करावे लागणार नाहीत. त्यामुळे अतिरिक्त खर्च टळणार असून पायलट प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक सुलभ होईल. या चाचणीअंतर्गत १० रुपयांच्या १०० कोटी आणि २० रुपयांच्या १०० कोटी पॉलिमर नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. या नवीन नोटा विद्यमान कागदी नोटांसोबतच वापरात राहतील. त्यामुळे नागरिकांकडे असलेल्या सध्याच्या १० आणि २० रुपयांच्या कागदी नोटा पूर्णपणे वैध राहणार असून त्या बंद होणार नाहीत. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर भविष्यात इतर मूल्यांच्या नोटांबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो.
देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या १० आणि २० रुपयांच्या नोटा वारंवार हाताळल्या जात असल्याने त्या लवकर खराब होतात, फाटतात किंवा त्यांचा रंग फिका पडतो. परिणामी रिझर्व्ह बँकेला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा बदलून नवीन नोटा छापाव्या लागतात. पॉलिमर नोटा मात्र सामान्य कागदी नोटांपेक्षा तीन ते चार पट अधिक टिकाऊ असल्याने छपाईचा खर्च आणि नोटांच्या बदलाची गरज मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनीही काही देशांमध्ये पॉलिमर नोटा ३० वर्षांहून अधिक काळ टिकल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ₹१,००० च्या पॉलिमर नोटांबाबत व्हायरल होणारे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आरबीआयने अशा कोणत्याही नोटा जारी करण्याचा प्रस्ताव नसल्याचे सांगितले असून नागरिकांनी चलनासंदर्भातील माहिती केवळ आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत प्रसिद्धीपत्रकांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

