वृत्तसंस्था : घोषणेपासूनच चर्चेचा विषय ठरलेल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी मराठी चित्रपटाने आता आणखी एक नवा टप्पा गाठला आहे. चित्रपटातील कथित भोंदूबाबाचे पहिले पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. समाजातील भोंदूगिरी, सत्तेभोवती फिरणारे संबंध आणि पडद्यामागील कथित वास्तव यांवर भाष्य करणारा हा चित्रपट राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत, मातोश्री एंटरटेन्मेंट वर्ल्डच्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी या चित्रपटातून समाजात वाढलेल्या भोंदूगिरीवर परखड भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. कथा, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले असून, संकल्पना सागरकुमार एस. जैन यांची आहे. चित्रपटातील ‘कॅप्टन तुम्ही मी नौका, तुमच्या प्रेमाचा टेबल टाका…’ हे उपरोधिक गाणेही प्रदर्शित करण्यात आले असून, त्यातील राजकीय रूपकांमुळे ते विशेष चर्चेत आले आहे.
पुण्यातील लेमन ट्री हॉटेलमध्ये आयोजित सोहळ्यात चित्रपटातील कथित भोंदूबाबाचा लूक अधिकृतपणे समोर आला. मागील काही दिवसांपासून पाठमोऱ्या पोस्टरमुळे निर्माण झालेल्या चर्चेला पूर्णविराम देत या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी झळकणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या वेगळ्या गेटअपने आणि व्यक्तिरेखेच्या गूढतेमुळे प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद, सुबोध भावे, उदय टिकेकर, अक्षय टंकसाळे, माधुरी पवार, भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. रोहित नागभिडे यांनी गाण्याला संगीत दिले असून, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजामुळे त्याला वेगळी रंगत मिळाली आहे. नृत्यदिग्दर्शन साहिल साह यांनी केले असून, तानिया चॅटर्जी यांनी गाण्यावर आकर्षक सादरीकरण केले आहे. छायाचित्रण आकाश काकडे, कलादिग्दर्शन अक्षय आंबेकर आणि वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि कथानकातून कोणत्या घडामोडींवर भाष्य केले जाणार, याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

