मुंबई : शासकीय रेशन दुकानांमधील काळाबाजार, वजनातील तफावत आणि वितरणातील गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘अन्नपूर्ती ग्रेन एटीएम’च्या माध्यमातून धान्य वितरणाची नवी प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा पायलट प्रकल्प नाशिक जिल्ह्यात यशस्वी ठरल्यानंतर आता मुंबई, ठाणे, नागपूरसह राज्यातील इतर भागांमध्येही ही आधुनिक व्यवस्था टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नुकतेच नाशिक येथे या ग्रेन एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या (WFP) सहकार्याने विकसित करण्यात आलेली ही यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार असून, पात्र शिधापत्रिकाधारकांना निश्चित प्रमाणात धान्य स्वयंचलित पद्धतीने उपलब्ध करून देणार आहे. सुमारे ५० लाख रुपये किमतीचे हे यंत्र महाराष्ट्राला विनामूल्य उपलब्ध झाले असून, त्यामध्ये एकावेळी सुमारे २,५०० किलो म्हणजेच २५ क्विंटल धान्य साठवण्याची क्षमता आहे. महाराष्ट्रात सध्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सुमारे ५४ हजार रास्त भाव दुकाने कार्यरत असून, त्यामार्फत जवळपास ७.५ कोटी लाभार्थ्यांना धान्याचा पुरवठा केला जातो. नवीन प्रणालीमुळे रेशन दुकानांवरील लांबच लांब रांगा कमी होण्याबरोबरच धान्य वितरण अधिक पारदर्शक आणि अचूक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘अन्नपूर्ती ग्रेन एटीएम’मधून धान्य घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रथम शिधापत्रिका किंवा आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करावी लागेल. त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण झाल्यावर शासनाच्या नोंदीतील पात्रतेनुसार मशीन अवघ्या ३५ सेकंदांत आवश्यक प्रमाणात धान्य वितरित करेल. संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित असल्यामुळे वजनातील त्रुटी, अपुरा धान्यपुरवठा आणि काळाबाजार यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. या यंत्रणेची मूळ क्षमता एका वेळी ५० किलोपर्यंत धान्य सुमारे पाच मिनिटांत वितरित करण्याची असली, तरी प्रत्यक्ष वितरणाची क्षमता स्थानिक व्यवस्थेनुसार निश्चित केली जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, आगामी काळात राज्यभर या आधुनिक यंत्रणेचा विस्तार केल्यानंतर लाखो लाभार्थ्यांना जलद, अचूक आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

