ठाणे : दिवाळीच्या सणात घरगुती फराळाला असलेली वाढती मागणी महिला बचत गटांसाठी आर्थिक संधी ठरत आहे. महिला विकास परिवार गृहउद्योगाच्या माध्यमातून ठाणे शहरातील २०० हून अधिक महिला बचत गटांनी तयार केलेल्या पारंपरिक दिवाळी फराळाची नऊ विक्री केंद्रांद्वारे विक्री सुरू असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून दरवर्षी सुमारे १८ ते २० लाख रुपयांची उलाढाल होत असून, ३०० ते ३५० महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे व्यवस्थापन महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार करत आहेत. यंदाही शहरातील विष्णुनगर, नौपाडा, लेकशोर मॉल, ब्रह्मांड, माजिवडा, एव्हरेस्ट वर्ल्ड-कोलशेत रोड, ब्लॉसम इंग्रजी शाळा, टीजेएसबी बँक-खोपट, वृंदावन बस डेपो, आकाशगंगा आणि एदलजी रोड-चरई परिसरात विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या स्टॉलवर घरगुती पद्धतीने तयार केलेल्या चकल्या, चिवडा, करंज्या, लाडू आणि इतर पारंपरिक फराळाचे पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
दिवाळीच्या धावपळीत अनेकांना घरी फराळ तयार करणे शक्य होत नसल्याने घरगुती चवीचा, दर्जेदार आणि वाजवी दरातील फराळ ग्राहकांना सहज उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला बचत गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून महिलांना केवळ हंगामी रोजगारच मिळत नाही, तर त्यांच्या गृहउद्योगाला ओळख, ग्राहकांचा विश्वास आणि कायमस्वरूपी बाजारपेठही मिळत आहे. दरवर्षी नऊ विक्री केंद्रांमधून सुमारे साडेचार हजार किलो फराळाची विक्री होत असून, त्यामुळे महिलांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे. उद्घाटन सोहळ्यास आमदार निरंजन डावखरे, कमल केळकर, माजी उपमहापौर सुभाष काळे, नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची ठरत असून, स्थानिक उद्योजकतेला चालना देतानाच स्वावलंबी महिला आणि सक्षम कुटुंब घडविण्यातही या उपक्रमाचा मोलाचा वाटा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

