पनवेल : दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात होणारी वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे विशेष नियोजन केले आहे. यंदा शहरातील पाच ठिकाणी सुमारे ५०० मोटारी उभ्या करण्यासाठी तात्पुरत्या वाहनतळांची व्यवस्था करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील अधिसूचना वाहतूक पोलीस विभागाकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. गणेशोत्सव आणि दसऱ्याच्या काळात वाहनतळांच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे नागरिकांना रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबरपासून दिवाळीच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे आणि प्रभाग अधीक्षक राजेश डोंगरे उपस्थित होते. बापट वाडा येथील जागेत सुमारे ६०, कर्मवीर भाऊराव चौक ते कर्नाळा भाजी मार्केट परिसरात ५० हून अधिक, नाट्यगृह परिसरातील वाहनतळावर १२० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाशेजारील मोकळ्या जागेत अडीचशेहून अधिक मोटारी उभ्या करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पनवेल महापालिकेने महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ६० जवान वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी उपलब्ध करून दिले असून, हे जवान सध्या शहरातील प्रमुख चौक आणि सिग्नलवर वाहतूक नियमनाचे काम करत आहेत. दिवाळीच्या काळात गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आणखी मनुष्यबळाची मागणीही करण्यात आली आहे. वाहनतळांची स्पष्ट माहिती देण्यासाठी आणि वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी वाहतूक पोलीस विशेष नियोजन करणार आहेत. कर्मवीर भाऊराव चौक ते कर्नाळा भाजी मार्केट या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नियंत्रित पद्धतीने वाहने उभी करण्याबाबतही स्वतंत्र अधिसूचना जारी केली जाणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी नागरिकांना निर्धारित वाहनतळांचाच वापर करण्याचे आवाहन केले असून, रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने उभी न करता वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. या उपाययोजनांमुळे दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याबरोबरच बाजारपेठांतील वाहतूक अधिक सुरळीत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

