मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ठाणे येथील चेना बीट परिसरात रानडुकरांची शिकार करण्यासाठी गेलेल्या एका गटाकडून झालेल्या गोळीबारात मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी विजय सुखरू सापटे (वय ६०) यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांपासून लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, मृतदेहावर पहाटेच अंत्यसंस्कार करून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. तसेच एका खाजगी डॉक्टराकडून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे खोटे प्रमाणपत्र मिळवल्याचेही तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी काशीगाव पोलिसांनी डॉक्टरसह चार जणांना अटक केली असून, हत्येसह पुरावे नष्ट करणे आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेत कुणाल शेलार आणि कल्पेश धंगाळा हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तपासादरम्यान डॉ. राजेश पालांडे यांनी प्रत्यक्ष तपासणी न करता व्हिडिओ कॉलच्या आधारे मृत्यूचे प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांना माहिती न देता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे नमूद केल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गोळीबारात वापरण्यात आलेले शस्त्र कोणाचे होते, त्याला वैध परवाना होता का आणि प्रत्यक्ष गोळी कोणी झाडली, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात महेश गायकर, कातोड, बिस्तूर आणि लाभड यांना अटक करण्यात आली असून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि काशीगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

