मुंबई : मुंबईतील नागरिकांना आग, इमारत कोसळणे, अपघात, झाडे उन्मळून पडणे, पाण्यात बुडणे तसेच इतर आपत्कालीन घटनांमध्ये तातडीने मदत मिळावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने १०१ या आपत्कालीन क्रमांकासोबत पाच पर्यायी भ्रमणध्वनी क्रमांक सुरू केले आहेत. एमटीएनएलच्या १०१ सेवेमध्ये तांत्रिक अडचणी किंवा बिघाड झाल्यास नागरिकांना मदत मिळण्यात विलंब होऊ नये, हा या निर्णयामागील उद्देश आहे. त्यामुळे आता ९०७६३३३१०१, ९०७६३३३१०२, ९०७६३३३१०३, ९०७६३३३१०४ आणि ९०७६३३३१०५ या क्रमांकांवरही नागरिकांना थेट अग्निशमन दलाशी संपर्क साधता येणार आहे. आपत्कालीन सेवेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या पर्यायी संपर्क व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षात दरवर्षी १५ हजारांहून अधिक आपत्कालीन कॉल येतात. आगीच्या घटनांबरोबरच इमारत कोसळणे, वाहन अपघात, झाडे उन्मळून पडणे, समुद्र किंवा तलावात बुडणाऱ्या व्यक्तींचे बचावकार्य, प्राणी-पक्षी अडकणे तसेच रस्त्यावर तेल सांडण्याच्या घटनांमध्येही अग्निशमन दल तातडीने मदत करते. सध्या मुंबईत ३५ अग्निशमन केंद्रे, भायखळा येथील मुख्य नियंत्रण कक्ष, भायखळा, वडाळा, मरोळ, बोरिवली, मानखुर्द आणि विक्रोळी येथील सहा प्रादेशिक समादेश केंद्रे, १९ लघु अग्निशमन केंद्रे आणि २२ जलद प्रतिसाद वाहने कार्यरत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन संपर्क व्यवस्था अधिक सक्षम आणि अखंडित ठेवण्याच्या दृष्टीने ही नवी सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.

