मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे शीव (सायन) रेल्वे स्थानक, विद्याविहार रेल्वे स्थानक आणि गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग (GMLR) येथील तीन बहुप्रतिक्षित उड्डाणपुलांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या. शीव येथील ११२ वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल असुरक्षित ठरल्याने आणि सीएसएमटी-कुर्ला दरम्यान पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका उभारण्यासाठी तो पाडण्यात आला होता. नव्या उड्डाणपुलामुळे धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), कुर्ला आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांमधील पूर्व-पश्चिम संपर्क अधिक सुरक्षित आणि वेगवान झाला आहे. नियोजित वेळेपेक्षा चार महिने आधी हे काम पूर्ण करण्यात आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विद्याविहार उड्डाणपूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्ग यांना जोडतो. या पुलामुळे विद्याविहार ते घाटकोपर दरम्यानचा ३० ते ४५ मिनिटांचा प्रवास अवघ्या १० मिनिटांत पूर्ण होणार असून घाटकोपर उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताणही कमी होईल. तर गोरेगाव-मुलुंड जोडमार्गावरील १.२६ किलोमीटर लांबीचा सहा पदरी उड्डाणपूल जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग ते दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील संतोषनगरपर्यंत वाहतूक अधिक सुलभ करणार आहे. दिंडोशी न्यायालय, वालभट नदी चौक आणि रत्नागिरी हॉटेल जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासही या पुलाचा मोठा फायदा होणार आहे. या तीनही उड्डाणपुलांमुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील संपर्क अधिक वेगवान होऊन लाखो प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

