मुंबई : विधिमंडळात सध्या एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे चड्डी बनियान गँगचा. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांना शिळं जेवण दिल्याबद्दल मारहाण केली होती. तोकड्या कपड्यांवर असलेल्या गायकवाड यांचा हा मारहाणीचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. आदित्य ठाकरेंनी सभागृहात चड्डी बनियान गँग म्हणत शिंदे गटाचा चिवचलं होतं. त्यानंतर यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आज काही आमदार बनियान घालून आले होते. कमरेला टॉवेल गुंडाळला होता. यावेळी त्यांनी चड्डी बनियान गँगच्या घोषणाही दिल्या.
सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येत अंगात बनियान घातली होती. कमरेला टॉवेल गुंडाळत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सतेज पाटील, महेश सावंत या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, चड्डी बनियान गँगने महाराष्ट्रात हैदोस घातला आहे. कँटिनमध्ये जाऊन आमदार कर्मचाऱ्याला मारहाण करतात. कुणी सिगारेट पिताना सुटकेसभर पैसे जगाला दाखवत. कुणी चड्डी-बनियानवर घरात बसून ओम फट म्हणतं. चड्डी बनियान गँगची दहशत पूर्वी महाराष्ट्रात होती. ही गँग शेतात, वस्त्यांवर दरोडे टाकायची. आताची चड्डी बनियान गँग महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचे काम करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.







