नागपूर : बोगस शिधापत्रिकांचा घोटाळा उघडकीस आला आहे. एकाच दिवसात बनावट शिधापत्रिका प्रत्येकी तीन हजार रुपये देऊन दलालाने वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरात घडला. तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली.
पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. पैसे घेऊन काम करून देण्याच्या नावावर दलाल सर्वसामान्यांची फसवणूक करीत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. आता तर चक्क बनावट शिधापत्रिकाच तीन हजार रुपयात तयार करून नागरिकांना त्याचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शहरातील गजानन सुरवाडे नामक दलालाने बनावट शिधापत्रिका तयार केल्या आहेत. तीन हजार रुपये घेऊन एका दिवसातच त्याने शिधापत्रिका तयार करून त्याचे वाटप केले. त्या शिधापत्रिका मिळालेले नागरिक नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या अन्न पुरवठा विभागात गेले. त्या ठिकाणी त्यांना मोठ्या धक्काच बसला. त्यांच्या शिधापत्रिकांवर दिलेल्या क्रमांकाची आधीच नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दलालाने या बनावट शिधापत्रिकांचे वाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे.







