नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या संविधानाच्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशवासीयांना शुभेच्छा देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील सर्व सदस्यांना विनम्र अभिवादन केले. सोशल मीडिया मंच ‘एक्स’वरील आपल्या संदेशात त्यांनी भारतीय संविधान हे विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी देशाला सातत्याने योग्य दिशा देणारे मार्गदर्शक दस्तऐवज असल्याचे नमूद केले. संविधान दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून, संविधान निर्मात्यांच्या दूरदृष्टीचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संविधानात समाविष्ट असलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी देशाची कटिबद्धता कायम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या व्हिडिओ संदेशातून संस्कृतमधील श्लोकही देशवासीयांशी शेअर करत संविधानाच्या आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन केले.
भारतामध्ये दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. १९४९ मध्ये याच दिवशी संविधान सभेने भारतीय संविधानाचा औपचारिक स्वीकार केला होता, तर २६ जानेवारी १९५० रोजी ते देशभरात लागू झाले आणि भारत सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला. संविधान दिन साजरा करण्यामागेही महत्त्वाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. २००९ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी राज्यात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये पंतप्रधान झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने १९ नोव्हेंबर २०१५ रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने अधिकृत अधिसूचना जारी केली. भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर तब्बल ६५ वर्षांनी हा निर्णय अमलात आला. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांचा प्रसार करून नागरिकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करणे, हा संविधान दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

