वृत्तासंस्था : क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच पुरुष आणि महिला क्रिकेटपटू एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि २०११ विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य झहीर खान याच्या सहमालकीच्या अँकर स्पोर्ट्स एबी (Anchor Sports AB) कंपनीने जर्मन क्रिकेट फेडरेशनच्या सहकार्याने ‘EQUAL’ या अनोख्या टी-२० लीगची घोषणा केली आहे. या स्पर्धेचे पहिले पर्व ऑगस्ट २०२७ मध्ये जर्मनीत होणार असून क्रिकेटमधील लैंगिक समानतेला नवे व्यासपीठ मिळणार आहे. या लीगमध्ये एकूण पाच संघ सहभागी होणार असून १२ सामने खेळवले जातील. प्रत्येक संघात १८ खेळाडू असतील, तर अंतिम ११ जणांच्या संघात सहा महिला आणि पाच पुरुष खेळाडूंचा समावेश असेल. टी-२० क्रिकेटचे मूलभूत नियम कायम ठेवले जाणार असले तरी पुरुष आणि महिला खेळाडू एकत्र खेळणार असल्याने सुरक्षितता, बदली खेळाडू आणि सामन्यादरम्यानच्या काही विशेष परिस्थितींविषयी स्वतंत्र नियम तयार करण्यात येणार आहेत. क्रिकेटमध्ये असा प्रयोग प्रथमच होत असल्याने जगभरातील क्रिकेटप्रेमींचे या स्पर्धेकडे लक्ष लागले आहे.
झहीर खान यांनी या उपक्रमाबाबत बोलताना क्रिकेट हा सर्वांना एकत्र आणणारा खेळ असल्याचे सांगितले. युरोपसारख्या नव्या बाजारपेठांमध्ये क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण संकल्पना महत्त्वाच्या ठरतील, असे त्यांनी नमूद केले. ‘EQUAL’ लीगमुळे महिला आणि पुरुष दोघांनाही समान व्यासपीठावर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जर्मन क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष सेव्हरिन वाइस यांनीही या लीगमुळे स्थानिक क्रिकेटला नवी चालना मिळेल आणि अधिकाधिक लोक या खेळाशी जोडले जातील, असे सांगितले. उपाध्यक्ष डॉ. विग्नेश संकरण यांनी जर्मनीत क्रिकेटची लोकप्रियता वाढत असल्याचे नमूद करत या स्पर्धेमुळे नव्या खेळाडूंना मोठी संधी मिळेल, असे स्पष्ट केले. अँकर स्पोर्ट्सचे सहमालक नागेंद्र सिद्धौताम यांनी अनेक वर्षांपासून पुरुष आणि महिला क्रिकेट स्वतंत्रपणे खेळले जात असले तरी ‘EQUAL’च्या माध्यमातून दोघांना एकाच संघात खेळवण्याचा हा ऐतिहासिक प्रयोग असल्याचे सांगितले. त्यामुळे क्रिकेटच्या भविष्यातील नव्या पर्वाची उत्सुकता आता अधिक वाढली आहे.

