नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)ने १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनाची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रोच्या ५७ स्थानकांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (डीएमआरसी) पत्र पाठवून काही मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्याची सूचना केली होती. पोलिसांच्या प्रस्तावानंतर डीएमआरसीने संबंधित स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ९ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजल्यापासून ही स्थानके बंद करण्यात येणार असून, परिस्थिती सामान्य होईपर्यंत हे निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. बंद करण्यात येणाऱ्या स्थानकांमध्ये मध्य दिल्ली, नवी दिल्ली, जुनी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली आणि वायव्य दिल्ली परिसरातील अनेक स्थानकांचा समावेश आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी संबंधित मेट्रो स्थानकाची स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होणार आहे. सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचा विचार करून भारतीय रेल्वेने १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते दुपारी २ या कालावधीत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांबाबत बदल केले आहेत. या स्थानकांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दिल्लीहून सुटणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी रेल्वे आणि मेट्रो सेवांबाबत अद्ययावत माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली प्रशासनाकडून सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.







