नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि गर्दीचे प्रभावी नियोजन करण्यासाठी प्रशासनाने विशेष निर्बंध लागू केले आहेत. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षित वाहतूक, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि भाविकांची गैरसोय टाळणे या उद्देशाने ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीचे नियमन करण्यात येणार आहे. अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी २८ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. या कालावधीत स्थानिक रहिवासी आणि बाहेरील वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले असून काही महत्त्वाच्या ठिकाणी प्रवेशबंदी लागू केली जाणार आहे. स्थानिक रहिवाशांनी गावात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी रिंगरोड–निवृत्तीनाथ मंदिर–पोलीस स्टेशन–थ्री लिव्हज हॉटेल–कुंभारतळे पार्किंग–जुना जव्हार फाटा या मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच नाशिककडे जाणाऱ्या स्थानिक वाहनांनी सापगावमार्गे प्रवास करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.
या कालावधीत गावाबाहेरील वाहनांना नवीन जव्हार फाटा तसेच रिंगरोडमार्गे त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश करण्यास बंदी राहणार आहे. नवीन जव्हार फाटा–डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक–लक्ष्मीनारायण चौक या मार्गावर इतर सर्व वाहनांसाठी नो-एंट्री लागू करण्यात येणार असून आवश्यक ठिकाणी प्रवेशबंदीचे फलक लावले जाणार आहेत. शासन अथवा प्रशासनाची विशेष परवानगी नसलेल्या कोणत्याही वाहनाला शहरातील गर्दीच्या किंवा प्रतिबंधित भागात प्रवेश दिला जाणार नाही. अशा वाहनांसाठी जुना जव्हार फाटा–थ्री लिव्हज हॉटेल–कुंभारतळे पार्किंग–निवृत्तीनाथ मंदिर–रिंगरोड हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्यक वाहतूक दिशादर्शक फलक आणि चिन्हे उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थितीनुसार निर्बंधांमध्ये आवश्यक बदल किंवा शिथिलता करण्याचे अधिकार प्रशासनाकडे राखीव असतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील संबंधित तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे ध्वजारोहण सोहळ्याच्या काळात स्थानिक नागरिक, भाविक आणि वाहनचालकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

