मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याला मंजुरी दिली असून, लवकरच त्यांच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी सरकारने ३४४.६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पुढील दोन ते चार दिवसांत टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. शनिवार किंवा सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर कोणताही हप्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये उत्सुकता वाढली होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३,००० रुपये एकाचवेळी मिळतील, अशी अनेक लाभार्थी महिलांची अपेक्षा होती. मात्र, सरकारच्या ताज्या निर्णयानुसार सध्या केवळ सप्टेंबर महिन्याचाच हप्ता मंजूर करण्यात आल्याने दिवाळीपूर्वी फक्त १,५०० रुपयेच खात्यात जमा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाल्याने लाखो लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला असला, तरी ऑक्टोबर महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता नेमका कधी जमा होणार, याकडे राज्यभरातील लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. दिवाळीपूर्वी दोन्ही महिन्यांचा निधी एकत्र मिळेल, अशी अपेक्षा असलेल्या महिलांना सरकारच्या या निर्णयामुळे काहीशी निराशा झाली आहे. दरम्यान, सरकारने मंजूर केलेला निधी संबंधित विभागामार्फत वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे ज्यांच्या खात्यात सुरुवातीला रक्कम जमा होणार नाही, त्यांनी घाबरून न जाता काही दिवस प्रतीक्षा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारकडून स्वतंत्र निर्णय किंवा निधी मंजुरीची घोषणा झाल्यानंतरच त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
