वृत्तसंस्था : ‘शिर्डी के साई बाबा’ या चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी शिर्डीकरांनी मदतीचा हात दिला आहे. शिर्डी ग्रामस्थांनी लाखो रुपयांची मदत केली आहे. १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपटामुळे साईबाबांची महती जगभरात पोहचली. मराठीसह हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारणारे अभिनेते सुधीर दळवी यांनी साकारलेली साई बाबांची भूमिका आजही खूप गाजत आहे. शिर्डीचे नाव जागतिक स्तरावर गेल्याने शिर्डीची मोठी भरभराट झाली. सध्या अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी साधारण १५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून दळवी कुटुंबियांनी चाहत्यांना मदतीसाठी आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शिर्डीकर पुढे सरसावले आहेत. २०२५च्या श्रीरामनवमी उत्सवात शिल्लक राहिलेल्या वर्गणीतील चार लाख आणि आणखी १ लाख अशी पाच लाखांची मदत त्यांनी सुधीर दळवी यांना केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विखे परिवार देखील सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी दीड लाख रुपये मदत देणार आहे. अभिनेते सुधीर दळवी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी साई चरणी प्रार्थना केली आहे. दरम्यान अभिनेते सुधीर दळवी यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने देखील तात्काळ दखल घेतली आहे. मुख्यमंत्री मेडिकल रिलिफ फंडातून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. सुधीर दळवी 86 वर्षांचे आहेत. ते ८ ऑक्टोबरपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात एडमिट आहेत. सुधीर दळवी यांनी सेप्सिससारखं जीवघेणं इन्फेक्शन झाले आहे. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘जुनून’, ‘चांदनी’ , ‘एक्सक्यूज मी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.







