वृत्तसंस्था : भारताचा दिग्गज डावखुरा सलामीवीर शिखर धवन असे मानतो की, एखाद्या खेळाडूसाठी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेणे ही खूप ‘विशेष’ भावना असते, ज्याला अनेकजण क्रिकेटच्या सर्वात मोठ्या टप्प्यांपैकी एक मानतात. एकदिवसीय विश्वचषकाचा आगामी हंगाम ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान भारतात होणार आहे. त्यात त्याचा समावेश होणं कठीण आहे. क्रिकेट विश्वचषक २०२३च्या अधिकृत प्रोमो लॉन्चिंगच्या वेळी बोलताना धवन म्हणाला, “जेव्हा तुम्ही विश्वचषक खेळता तेव्हा त्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूची भावना ही देशासाठी खेळणार अशी अभिमानाची असते. तसेच, जेव्हा तुम्ही द्विपक्षीय मालिका खेळता तेव्हा ती भावना वर्ल्डकपपेक्षा वेगळी असते. तुमचा मुख्य उद्देश असतो की, विश्वचषक कधी येणार आहे. म्हणूनच आपण त्यासाठी स्वतःला परिपक्व बनवत असतो. द्विपक्षीय मालिका ही एक मॅच बाय मॅच प्रक्रियेसारखी असते. मोठे ध्येय गाठण्यासाठी तुम्ही छोटी पावले उचलता आणि अर्थातच ही एक पूर्णपणे वेगळी प्रक्रिया असते.” धवन म्हणाला, “जेव्हा माझे नाव विश्वचषक संघात पहिल्यांदा आले, तेव्हा मी खूप आनंदी होतो आणि त्यावेळी असे वाटले की भविष्यात लोकं म्हणतील की, ‘इतिहास में शिखर धवन नाम आ गया है की वह भी कभी विश्व कप भी खेले हैं”, अशा पद्धतीने त्याने भावनांना वाट मोकळी करून दिली. “इतिहासात उल्लेख होईल की धवन विश्वचषक संघाचा एक भाग होता. त्यामुळे एक क्रिकेटर म्हणून ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप मोठी भावना आहे. पण त्यावेळी खूप दबाव असतो आणि तो घेऊन खेळायचं असतं”, असेही तो पुढे म्हणाला.
२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मंचावर पदार्पण करणाऱ्या धवनने युवा पिढीच्या फलंदाजांच्या मानसिकतेबद्दल आणि कोणत्याही दबावाशिवाय मुक्तपणे व्यक्त होण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल पुढे सांगितले. धवन म्हणाला, “हे पाहणे खरोखर चांगली बाब आहे की, येणारी पिढी ही नव्या विचाराची आहे. बदल ही जीवनातील एकमेव गोष्ट आहे. काळाशी ताळमेळ राखावा लागेल. खेळाडूंनी नवीन रणनीती आणि विचार करण्याच्या नवीन पद्धती कशा तयार केल्या आहेत हे पाहणे माझ्यासाठी उत्सुकतेचे असणार आहे. अगदी… आम्ही पण आमच्यावेळी असेच केले होते. इतके दिवस खेळल्यानंतर, तरुण खेळाडू जेव्हा काही नवीन शॉट्स घेऊन येतात तेव्हा आम्हा सर्वांना खूप प्रेरणा मिळते आणि मी वैयक्तिकरित्या ‘तुम्ही ते कसे खेळले?’ याबाबत त्यांना विचारत असतो.”
डावखुरा फलंदाज शिखर धवनने त्याच्या कारकीर्दीतील एक प्रसंग आठवला, जिथे त्याने आक्रमक स्वभावाचा फलंदाज सूर्यकुमार यादवकडून एक शॉट शिकण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, “मी स्कायला विचारत होतो, त्याने तो जो षटकार मारला तो कसा मारला?, असे मी त्याला विचारले.” यावर ‘मिस्टर ३६० डिग्री’ म्हणजेच सूर्यकुमार म्हणाला, “यार, तू काय करतोस? मी फक्त वाकतो आणि आणि स्वीप करून फटका मारतो.” धवन त्यावर म्हणाला की, “मी हे सराव करताना हा शॉट खेळून पाहणार आहे. तसेच, तुम्ही जितके जास्त साधने घेऊन जाऊ शकता तितके सोपे होते आणि ही एक आक्रमक मानसिकता आहे.” जेव्हा शिखरने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हाच्या काळाची आणि या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा आधुनिक दृष्टिकोन यांची तुलना केली. ३७ वर्षीय फलंदाजाने स्पष्ट केले की, “युवा मानसिकता सामन्यामध्ये गेम चेंजर कशी बनत आहे?”खेळाडूंची विचार प्रक्रिया व्यापक होत आहे. पूर्वी आमचे प्रशिक्षक आम्हाला मैदानात खेळायला सांगायचे, तुम्हाला मोठे शॉट्स खेळण्याची गरज नाही. त्यामुळे आम्ही अशाच मानसिकतेने मोठे झालो, पण आता जेव्हा तुम्हाला एखादा तरुण येताना दिसेल, तेव्हा ते त्याचे विचार हे स्पष्ट असतात आणि त्याप्रमाणे तो व्यक्त होत असतो.” धवन पुढे म्हणाला, “म्हणून, पुन्हा, मुख्य गोष्ट अशी आहे की, विश्वचषकात खेळणे ही एक विशेष अनुभूती असते. यावेळी देखील मला खेळण्याची इच्छा आहे पण संधी मिळणार का? यावर अवलंबून असेल. धवनने ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच ५० हून अधिक जागतिक ICC स्पर्धांमध्ये त्याचा उत्कृष्ट विक्रम आहे. त्याने २०१३, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१५ आणि २०१९च्या पुरुष क्रिकेट विश्वचषकांमध्ये सहा शतकांसह ६५.१५च्या सरासरीने १२३८ धावा केल्या आहेत.